Events & Activities

कायद्याच्या शिक्षणातील चांगल्या बदलांमुळे अनेक संधी उपलब्ध
पुणे, दि. १६ : “कायद्याचे शिक्षण अतिशय महत्वाचे असून त्यात अनेक चांगले बदल झाले आहेत. तीन वर्षांच्या शिक्षणानंतर अगदी तरूण वयातच न्यायव्यवस्थेत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आर्बिट्रेशन, कायद्याच्या क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक संस्था यामुळे नवीन वकीलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध झाल्या आहेत. तालुका आणि जिल्हा न्यायालयातील वकिली ही खरी वकिली असून वकिलांना तिथे फार मोठा वाव आहे,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती मा. न्या. अभय एस. ओक यांनी आज (शनिवार, दि. १६ ऑगस्ट २०२५) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘एमईएस लॉ कॉलेज’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, या वेळी “कायदा क्षेत्रातील व्यावसायिक भवितव्य आणि नव-अधिवक्त्यांची भूमिका” या विषयावर न्या. ओक बोलत होते. कोथरूडमधील म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी म.ए.सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता मा. अॅड. चिन्मय खळदकर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लॉ स्कूलच्या संचालक आणि विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि म. ए. सो. च्या नियामक मंडळचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.
एमईएस लॉ कॉलेजच्या महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष व म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. सागर नेवसे, एमईएस लॉ कॉलेजचे महामात्र व म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि म.ए.सो. चे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
“भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्येदेखील सांगितली आहेत. प्रत्येक नागरिकाने या कर्तव्यांचे पालन करणे, घटनात्मक संस्थांचा आदर करणे आणि राष्ट्रीय आदर्शंचा सन्मान करणे आवश्यक आहे. परंतू कायदा आणि या मूलभूत कर्तव्यांविषयी असलेल्या अज्ञानातून अनेक घटना घडत असतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. वकिली व्यवसायात लहान-मोठे असे काही नसते. तालुका व जिल्हा न्यायालयांमध्ये पक्षकाराचे भवितव्य कायमचे घडते किंवा बिघडते, त्यामुळे या न्यायालयांमधील वकिली अतिशय महत्वाची आहे,” असेही न्या. ओक या वेळी म्हणाले.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड म्हणाले, “सातत्याने केलेले कष्ट आणि चिकाटी यामुळेच वकिलीच्या क्षेत्रात यश नक्कीच मिळते. तंत्रज्ञानामुळे वकिलीचे स्वरुप आता पूर्णपणे बदलले आहे. सायबर लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सातत्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे.”
मा. अॅड. चिन्मय खळदकर यांनी आपल्या व्याख्यानात आर्थिक आणि सामाजिक गुंतागुंत वाढल्यामुळे न्यायालयासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. भविष्यातील विविध आव्हाने, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारी गुंतागुंत, अडथळे यामुळे होणाऱ्या बदलांमुळे वकिलांसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सर्वच स्तरावर आणि विशेषतः करविषयक कायद्यांच्या क्षेत्रात चांगल्या वकीलांची फार मोठी गरज असल्याचे ते म्हणाले. भाषेवर प्रभुत्व, कल्पनाशक्तीचा आणि ऐकून घेण्याची कला यांचा विकास हाच वकिलीच्या क्षेत्रातील यश आणि समाधानाचा पाया आहे असल्याचे सांगितले.
मा. बाबासाहेब शिंदे म्हणाले की, म.ए.सो.ने कायमच मूलभूत शिक्षणाबरोबरच समाजाची गरज ओळखून व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्या परंपरेनुसार संस्थेने आता विधी आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होत असून भविष्यात ही महाविद्यालये शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवतील.
म.ए.सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, वकिलीच्या क्षेत्रात ज्ञान आणि आत्मविश्वास अतिशय आवश्यक असून प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात कायद्याविषयी सज्ञानता असणे महत्वाचे आहे असे सांगितले.
मा. अॅड. सागर नेवसे यांनी आपल्या प्रास्ताविकात एमईएस लॉ कॉलेजमध्ये क्रमिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये अनुभवावर आधारित व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
म.ए.सो. चे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.
समारंभाचे सूत्रसंचालन एमईएस लॉ कॉलेजच्या प्रा. शिवानी मुजुमदार यांनी केले.

Scroll to Top